Thursday, October 26, 2006प्रस्तावना-
मिलींद बोकील ह्यांचं 'शाळा' हे पुस्तक नुकतचं वाचनात आलं आणि शाळेत घालवलेला क्षण न क्षण पुन्हा डोळ्यासमोर उभा राहीला. अगदीच शाळेशी संबंधीत नसल्या तरीही शालेय जीवनात घालवलेल्या मंतरलेल्या क्षणांच्या काही आठवणी..सकाळी ८ ची वेळ. नेहमीप्रमाणे उठायला उशीर झालेला. आज पण क्लासला वेळॆवर पोहोचू की नाही ह्याची खात्री नव्हती. नाही म्हटलं तरी घरापासून क्लास हे अंतर अदांजे ४-५ किलोमीटर असेल. दिमतीला सायकल जरी असली तर्री १०-१२ मिनीटं लागायचीच. केसांवर कंगवा फ़िरवता फ़िरवता घडाळ्यात पाहीलं तर बरोबर ८.१५ वाजले होते, " बापरे सव्वा आठ!आई, निघतो गं" असं म्हणून लगेच सायकलवर टांग मारली.

नेहमीच्याच उत्साहात सायकल दामटली आणि बघता बघता क्लास जवळ पोहोचलो होतो. घडाळ्यात पाहीलं तर ८.२७.. "छ्या, कालचा ११ मिनीटाचा रेकोर्ड मोडता आला नाही." स्वत:शीच म्हटलं, पण ते फ़ारसं महत्वाचं नव्हतं.
दम बराच लागला होता पण तरीही आज माझ्या चेह-यावर स्मितहास्य होतं. स्वप्नीलने माझ्याकडे पाहीलं, तो हसत म्हणाला, "इतका आटापिटा करण्यापेक्षा लवकर उठावं जरा". माझ्या स्मितहास्याचं कारण त्याला माहीत होतं...आम्ही दोघेही खळाळून हसलो अणि तो नेहमीप्रमाणे सायकल घेऊन राऊंड मारायला गेला.

मी खिशातला रुमाल काढून घाम पुसला, बाजूच्याच नळावरचं पाणी चेह-यावर मारलं. मस्त थंडगार वाटलं. पुन्हा एकदा केसावर कंगवा फ़िरवून ते व्यवस्थित आहे ना ह्याची खात्री केली.तेवढ्यातच ती आधीची बॅच सुटली.७.३० ते ८.३० ही बॅच फ़क्त मुलींचीच. सगळ्या मुली हळूहळू बाहेर पडायला लागल्या. मी ज्या क्षणाची आतुरतेने की काय म्हणतात ती वाट बघत होतो, तो जवळ आला...

..पण ती आज कुठेच दिसत नव्हती. काल मला उशीर झाला, पण आज तीच आली नाही का ? तब्येत बरी नसावी कदाचित.. पण आजकाल तिच्या बाबांचीच तब्येत बरोबर नसते. खूप ड्रिंक्स घेतात म्हणे, मध्यंतरी हॉस्पिटल मध्ये पण होते ,काही .... छे ! कसले विचार करतोय, मी..

मनात तर्कवितर्क चालू होते;पण तितक्यातच ती दिसली..येSSsस... तोच नाजूक बांधा ...छोटेसेच पण मुलायम केस आणि त्यावर तो लाल रंगाचा हेअरबॅंड, तेच सुदंर निरागस डोळे .... न सांगताही बरच काही सांगणारे.....तितक्यात...तितक्यात आमची नजरानजर झाली....नेहमीप्रमाणे...क्षणभरासाठीच ! ....आणि पुन्हा एकदा ह्र्दयाचा एक ठोका चुकला...ती हसली का?.. की नाही.. काही कळलं नाही ..असो,माझ्या चेह-यावर पुन्हा ते स्मितहास्य झळकलं...माझी मेहनत सार्थकी लागली होती.

गेले कित्येक दिवस हा दिनक्रम न चुकता चालू होता. ती नजरानजर एकही दिवस झाली नाही तरी दिवसभर बेचैन व्हायला व्हायचं. तशी ती माझ्या शाळेतही होती पण 'अ' वर्गात आणि मी होतो 'ब' वर्गात. ती दिसायला जितकी सुंदर होती तितकीच अभ्यासातही हुशार. माझ्या आठवणीप्रमाणे पहीलीपासून शाळेत पहील्या येणा-या कविता सहस्त्रबुद्धेला तिने गेले २ वर्ष मागे टाकलं होतं. त्यामुळे तिचं जसं शाळेतही कौतुक व्हायचं, तसं क्लास घेणा-या दीदीकडूनही..आणि मी तर काय ...माझी विकेट कधीच उडाली होती !!

...पण आज काही केल्या दीदीच्या शिकवण्याकडे माझं लक्ष लागत नव्हतं..मी शून्य नजरेने फ़ळ्याकडे पहात होतो..मनात विचारांचा धूमाकूळ चालू होता..हे असं किती दिवस चालायचं.. दहावीत आलो, एवढा घोडा झालोय पण एका मुलीशी साधं बोलताही येऊ नये..छे..पण काहीतरी कारण काढून आपण बोलायचचं..पण काय कारण काढायचं.. काहीच सुचत नव्हतं...की डायरेक्ट सांगून टाकायचं ?..आणि ती नाही म्हणाली तर ..पण, ती नाही कशाला म्हणेल..ती पण लाईन देतेच की मला..

"पितळे, लक्ष कुठे आहे तुझं ?" दीदीच्या त्या विधानाने मी एकदम भानावर आलो."अं... काही नाही", मी म्हटलं...पण नेहेमीप्रमाणे त्या दिवशी माझं क्लासमध्ये लक्षच लागलं नाही.

क्लास सुटला...मी स्वत:शीच म्हटलं..बास !! झालं तेवढं पुरे आह....आता आपण तिला सांगायचच ....पण कधी, कुठे ? ..हो ,बरोबर..'दर शनिवारी ती मारुतीच्या देवळात जाते क्लास सुटल्यावर' असं मला एका गुप्तहेर मित्राने सांगितल्याच आठवलं...ठरलं तर मग, अनायसे उद्याच शनिवार आहे.उद्याच दांडी मारू क्लासला !!मनाशी पक्क ठरवलं, तो दिवस आणि बरीचशी रात्र दुस-या दिवशीचं प्लॅनिंग करण्यात निघून गेले. नेहेमीप्रमाणेच तिचा विचार करताना डोळा कधी लागला ते कळलच नाही.


..शनिवार उजाडला. मी नेहमीप्रमाणे क्लासला जायला घरून निघालो. आज जरा लवकरच निघालो, पण क्लासच्या जवळ देखील गेलो नाही ८.३५ पर्यंत. मित्रांनी बघितलं असतं की हा इथे येऊन पण क्लासला आला नाही तर उगाच नको त्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागली असती, आधीच चिडवचिडवी काय कमी चालली होती....
आज ती पुन्हा नेहेमीप्रमाणे दिसली, तेच मोहक डोळे, तोच लाल हेअरबॅंड, तिच... कदाचित मलाच शोधणारी नजर....
पण मी आज नजरानजर करायला जाणार नव्ह्तो. थोड्याच वेळात एक इतिहास घडणार आहे ह्याची तिलाही कल्पना नव्हती...

..तिला न दिसेल असं अतंर ठेवून मी नकळात त्या ग्रूपच्या मागे गेलो. तिचं घर तसं क्लासपासून ५ मिनीटाच्या अतंरावर होतं. तो ४-५ जणींचा थवा तिच्याच घरी गेला. इतक्या सगळ्याजणींसमोर मी तिला हे सांगण बर दिसलं नसतं....छे,छे..मी घाबरत वगैरे मुळीच नव्हतो,पण उगीच सगळ्यांसमोर तमाशा कशाला? ... मी केलेल्या प्लॅन प्रमाणे तिच्या घरासमोरच्या बसस्टॉपसमोर शांतपणे उभा राहीलो.

थोड्यावेळाने तोच थवा माझ्यासमोरून पुन्हा देवळात गेला. पण मी ही फ़ुल्टू प्लॅनिंग केलं होतं,मलाही माहीत होतं की परत येताना ती एकटीच असेल. तो पर्यंत मनातल्या मनात मी सगळी वाक्य पाठ करून घेतली. तसं माझ पाठांतर चांगल होतं, पण म्हटलं वेळ आहे तर पुन्हा एकदा उजळणी केलेली बरी...तसा तिच्या संभाव्य प्रतिक्रीयांचा विचार करून त्यावर आपण प्रतिक्रीया काय असेल ह्याची तयारी कधीच झाली होती. एकंदरीत झालेलेया पूर्वतयारीच्या जोरावर फ़क्त तिला जाऊन सांगायचं इतक छोटसच काम बाकी होतं ! ..मी ही अगदी बिनधास्त होतो.

..तितक्यात ती समोरून येताना दिसली. अपेक्षेप्रमाणे ती एकटीच होती...माझा हा अदांज बरोबर ठरल्याने माझा आत्मविश्वास अजूनच वाढला...मी रस्ता पार करण्यासाठी पहीलं पाऊल उचललं. आमचे रस्ते एकमेकाला काटकोनात छेदणारे होते..अजूनपर्यंत सगळं व्यवस्थित चाललं होतं..पण कस काय जाणे,पहील्याच पावलावर काळजाचा
एक ठोका चुकला...त्यानतंर दुस-या पावलावर दुसरा..ठोके नक्की चुकत होते की ह्र्दयाची स्पंदनं वाढत होती ? .. छे काहीचं कळत नव्हतं...प्रत्येक पावलागणीक मला मराठीतल्या अनुक्रमे,'काळजाचा ठोका चुकणे', 'छातीत धस्स होणे ','पोटात गोळा येणे' अशा सगळ्या वाक्यप्रचारांचा अर्थ नव्याने आणि ख-या अर्थाने अर्थ कळत होता...
...शेवटी ती, दोन फ़ुटांवर असताना,इतर सगळ्या वाक्यप्रचारांबरोबरच ,'तोंडातून ब्र देखील न निघणे' ह्या ही वाक्यप्रचाराचा अर्थ मला कळला , आणि माझ्याकडे 'ढुंकूनही न पहाता' ती तशीच निघून गेली.

थोडक्यात काय तर, कुठल्याही शिक्षकांडून न समजेलेल्या ह्या सगळया वाक्यप्रचारांचं 'संदर्भासहीत स्पष्टीकरण' मला मागच्या ३० सेकंदात मिळालं होतं..

..एकंदरीत हे प्रकरण आपल्या आवाक्याबाहेरच आहे ह्याची जाणीव मला झाली...पण मी ही थोडक्यात हार मानण्यातला नव्हतो. पण तरीही काही केल्या तिच्याशी बोलायला मिळत नव्हत ते नव्हतच..


काही दिवस असेच निघून गेले. एके दिवशी मला क्लासमध्ये कुणाची तरी वही मिळाली. उघडून बघितलं तर नाव 'माधुरी'. मला ते परिचीत वाटलं नाही. आजूबाजूला विचारपूस केल्यावर कळलं की, ती आधीच्या बॅच मधल्या कुणाची तरी आहे. मी दीदीला ती वही देणारच होतो...इतक्यात माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला! तिच्याशी बोलायची ही संधी मी नक्कीच सोडणारा नव्हतो. ऐनवेळी काहीच न बोलता येण्याचा आधीचा थोडा अनुभव गाठीशी होताच; पण 'प्रपोज' वगैरे करण्यापेक्षा ही भानगड फ़ारच सोप्पी होती. मी उत्साहाने पुन्हा एकदा माझं फ़ुल्टू प्लॅनिंग केलं, ती वही न विसरता फ़ोल्डर मध्ये ठेवली आणि पुन्हा तिचाच विचार करत रात्री झोपी गेलो.

दुस-या दिवशी तिचा क्लास सुटल्यावर मी न घाबरता पुढे गेलो आणि म्हटलं, "अगं मानसी,तुमच्या बॅचमधल्या कुणाचीतरी वही काल विसरली होती...ही बघ.. तु देशील का?".....आयला! दोन सेकंद माझा माझ्या तोडांवर आणि तिला तिच्या कानावर विश्वासच बसला नाही. पण लगेचच दोघेही भानवर आलो, माझ्या चेह-यावर ते पेटंट स्मितहास्य होतेच !ती स्वत:ला सावरत म्हणाली,"हो, बरं...ठीकाय.... देते की ! " आणि गोड हसली... पुढे काय होतंय हे कळण्याआधीच दोघेही एकमेकांच्या पुढे निघून गेलो.

आधीच्या अपयशानंतर मिळालेल्या ह्या अनपेक्षित यशाने मी अगदी आनंदून गेलो.(वरील वाक्यामधले 'मानसी' हे तिचे बदललेले नाव आहे,हे सुज्ञास सांगणे नलगे :) )

मला वाटत होतं की ती दुस-या दिवशीतरी स्वत:हून सांगेल की, मी ती वही दिली...पण छे कसलं कायं. शेवटी न राहवून मीच तिला तिस-या दिवशी विचारलं, "हाय मानसी,... तु ती वही दिलीस का?"...ती ही सहजतेने म्हणाली, "हो नं... दिली की..माधुरीने तुला थॅंक्स सांगितलयं, मी तुला काल सांगायला विसरले"..मी म्ह्टलं, "ठीक आहे गं, चलता है".....हे ही बोलणं तितक्यावरच खुटंल.

त्यानंतर पुन्हा काही बोलायची संधी आली नाही. वाटेत दिसली की हसायची फ़क्त ,इतकीच काय ती प्रगती. मी तरी काय बोलणार आणि केंव्हा ?

बरेच दिवस असेच निघून गेले. पण घोडं अडलं ते अडलचं. सहामाही परीक्षा देखील जवळ आली होती, त्यामुळे त्याचाही अभ्यास करायचा होताचं.... परीक्षा आली ,गेली, निकाल लागले...आणि ह्या सगळ्या गडबडीत ख-या अर्थानेच माझे 'निकाल लागले' !

दहावीच महत्वाचं वर्ष असल्याने मी निदान आतातरी अभ्यासात जोर लावायचं ठरवलं. पण मानसीच हे खूळ सहजासहजी डोक्यातून जाण्यासारखं नव्हतं. शेवटी मानसीच्या हुशारीचा मला काही उपयोग करून घेता येईल का असा हुशार विचार माझ्या मनात आला ! पाठांतर तर सगळेच करतात पण ही असं लिहीते काय की हीला इतके मार्क्स पडतात !!आय़डीया, मानसीकडून तिच्या सहामाहीच्या उत्तरपत्रिका घेतल्या तर ? !! वा !! एका दगडात दोन पक्षी !! मी स्वत:चीच पाठ थोपटली..

आणि मग काय...त्या निमित्ताने तिच्याशी पुन्हा बोललो पण आणि उत्तरपत्रिकापण मिळवल्या....घरी गेल्यावर उघडून पाहील्या..तिचं हस्ताक्षार तिच्याइतकच सुंदर होतं...इंग्रजीमध्ये लेटर तर काय अप्रतिम लिहीलं होतं..I, undersigned,.. वगैरे वगैरे. तिची ती लिहीण्याची पद्धत मला खूप आवडली. तिला ते पेपर्स परत देताना तसं सांगितलं देखील !! सुमारे दोन आठवड्याच्या ह्या (माझ्यासाठीच्या) गोड काळानंतर आम्ही एकमेकांना व्यवस्थित ओळखही दाखवायला लागलो होतो आणि दिवस स्वप्नवत छान चालले होते.


...मध्ये एक दोन दिवस ती क्लासला आली नाही, नेहमीप्रमाणे ती तिच्या घराच्या व-हांड्यात अभ्यास करत बसलेली पण मला ती दिसली नाही! मला थोडं आश्चर्य वाटलं, पण मी काही सिरीयसली घेतलं नाही आणि नेहमीप्रमाणे आपला क्लासला जाऊन बसलो. दीदी कुणाशी तरी बोलत होती....पण त्या दिवशीचे कानावर पडलेले शब्द ऐकून मी हादरलोच...दीदी सांगत होती ,"अरे त्या मानसीचे वडील....."

.. कानावर क्षणभर निखारे पडल्याचा भास झाला ,पायाखालची जमीनच सरकली....माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना ...२० दिवसांवर प्रिलीम आली असताना असं होऊच कसं शकतं,ति कशी असेल आता.... काय अवस्था झाली असेल ..इतक्या हुशार मुलीच्या बाबतीत असं का व्हावं....एक ना अनेक प्रश्न...सगळेच अनुत्तरीत!

...पुढच्या दोन रात्री मी झोपू शकलो नाही...शक्यच नव्हतं ते...

चौथ्या दिवशी क्लासला गेलो असताना मला अचानक ती समोर दिसली. ती इतक्या लवकर क्लासला दिसणं मला अगदीच unexpected होतं. मी बेसावध असतानाच आमची पुन्हा नजरानजर झाली... पण नेहमीच्या चमकदार डोळ्यात आज कारुण्याची लकेर स्पष्ट दिसत होती....ते डोळे गेल्या तीन दिवसांबद्दल बरच काही सांगत होते.....मला तिच्याशी खूप बोलायच होतं.. पण तोंडातून शब्दच निघेना... त्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी मी खूपच कमकुवत होतो आणि चौथ्या दिवशी क्लासला आलेली ती, तितकीच कणखर !


... त्यापुढे आमच बोलणं, आजतागायत कधी झालच नाही...तिचा प्रिलीमचा निकाल काय लागला ते ही मला कळल नाही..

त्यानंतर मी शाळेत गेलो ते s.s.c. च्या रिझल्टच्या वेळी !! ह्या वेळी पहीली कविता सहस्त्रबुद्धेच येणार ह्यावर ब-याच मित्रांच एकमत होतं...आणि माझही...त्यामुळे मला त्याचाशी काही देणंघेणं नव्हतं....स्वत:चा रिझल्ट घ्यायला जात असताना मी सहजच बोर्डकडे पाहीलं.......क्षणभर माझा डोळ्यांवर विशासच बसेना.... मानसी शाळेत पहीली आली होती...कवितापेक्षा तब्बल ४ टक्क्यांनी पुढे ...आणि ९३% मिळवून मेरीटमध्ये सुद्धा ! सगळेजण तिचच कौतुक करत होते...काहीच सुचत नव्हतं...मन आनंदाने न्हाऊन निघाल होतं....त्या दिवशीही आमची नजरानजर झाली आणि पुन्हा एकदा माझ्या तोंडातून 'ब्र' देखील निघाला नाही!.... पण मनातल सगळं प्रेम डोळ्यात दाटून आलं होतं, आणि त्या डोळ्यांनीच मी तिला एकच वाक्य सांगितलं," I AM VERY VERY PROUD OF YOU ....."

......कधीकधी मागे जाऊन विचार करताना वाटतं की , मी त्यावेळी खरच प्रपोज केलं असतं तरं? ती हो म्हणाली असती की नाही ?...पण आता विचार करताना कुठेतरी नक्कीच वाटतं की ती जे झालं ते चांगलच झालं. ती जे काही म्हणाली असती ते असती but I was not worth her..

पुढे दोन एक वर्षांनी तिचा पेपरात फ़ोटो पाहीला होता....MH-CET मध्ये राज्यात चौथी आली होती.....आणि आता ती डॉक्टर झाली आहे !!

अजूनही मला इंग्रजीतून कधीतरी पत्र लिहायची वेळ येते, तेंव्हा त्याची सुरुवात,'I undersigned' अशीच होते आणि त्यावेळेला तिची आठवण आल्याशिवाय रहात नाही....जो हुआ, सो हुआ ...पण एक मात्र नक्की, I was/am very proud of my choice..... very much, indeed..... :)